महाराष्ट्राने खोदली नवपेशवाईची कबर !

0
Want create site? With Free visual composer you can do it easy.

By- सुनील खोबरागडे

महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शपथ घेतली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांच्या व अन्य लहानसहान पक्षांच्या सहभागातून स्थापन झालेल्या या महाविकास आघाडीचे हे सरकार ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. मागील पाच वर्षात महाराष्ट्रात हैदोस घालणाऱ्या नवपेशवाईने महाराष्ट्रातील शुद्रातिशूद्र आणि अल्पसंख्याकांचे जिणे हराम केले होते. आज रा.स्व.संघ-भाजपच्या अभद्र मनसुब्यांना हाणून पाडुन स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार फडणवीस सरकारकडून पिडल्या-नाडल्या बहुजन समाजाच्या आशा-आकांक्षांना दिलासा देणारे आहे असे म्हणावे लागेल. महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्रात मागील महिनाभरात ज्या घडामोडी घडल्या त्या अविश्वसनीय वाटत असल्या तरी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीला कलाटणी देणाऱ्या आहेत.

संसदीय लोकशाही व्यवस्थेत नियत कालावधीत निवडणुका होणे व त्यायोगे सत्ताबदल होणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन करणे हा केवळ साधारण राजकीय सत्ताबदल नाही. भारताच्या एकंदरीत राजकीय आणि सामाजिक स्थितीवर दीर्घकाळ परिणाम करू शकणारी ही एक क्रांतिकारक घटना आहे. शिवसेनेचा जन्म सत्तरच्या दशकात मुंबईतील समाजवादी-कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखालील कामगार कष्टऱ्यांची चळवळ समाप्त करण्यासाठी झाला ही वास्तविकता आहे. यासाठी तत्कालीन कॉंग्रेस पक्षाने बाळ ठाकरे यांना बळ दिले. बाळ ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करून कॉंग्रेस पक्षाला अपेक्षित कामगिरी पार पाडली. मात्र पुढील काळात शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांनी उघडपणे हिंदुत्व हेच भारतीयत्व ही भूमिका घेऊन महाराष्ट्रात ब्राह्मणशाही बळकट केली.

आज महाराष्ट्रात रा.स्व.संघ-भाजपला जी समाजमान्यता लाभली आणि ब्राह्मणी उन्मत्तपणा बळकट झाला त्यास बऱ्याच प्रमाणात बाळ ठाकरे आणि शिवसेना जबाबदार आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. २०१४ मध्ये भारताचे प्रधानमंत्री म्हणून रा.स्व.संघ-भाजपचे सेवक नरेंद्र मोदी विराजमान झाले. तेव्हापासून रा.स्व.संघ-भाजपने भारताच्या राजकीय पटलाची, संवैधानिक बांधणीची, सामाजिक सौहार्द्राची मागील पाऊण शतकात विणली गेलेली विण उसवून टाकण्याचा आततायी प्रयत्न चालविला होता. या प्रयत्नाला ज्यांची साथसोबत होती अशा प्रमुख पक्षांपैकी महाराष्ट्रातील शिवसेना हा एक पक्ष होता. मागील पाच वर्षात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात रा.स्व. संघाने पेशवाईचे पुनरुज्जीवन केले होते त्यात शिवसेना बरोबरीने सहभागी होती.

पुढेही शिवसेना शेंडी-जाणव्याच्या अघोरी पाशातून मुक्त होणार नाही आणि ब्राह्मणशाही मजबूत करण्याच्या कृत्यात सर्वार्थाने सामील राहणार असेच वाटत होते. या स्थितीत भाजपचा चौखूर उधळलेला वारू रोखण्याचे आणि नवपेशवाई उलथुन टाकण्याचे सामर्थ्य कोणातही नाही अशी समाजधारणा तयार झाली होती. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात शरद पवार नावाच्या एका ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध योद्ध्याने रा.स्व.संघ-भाजपला दाती तृण धरावयास लावून नव पेशवाई उलथुन टाकली आहे. शिवसेना आजवर बहुजन समाजातील आपल्या समर्थकांच्या खांद्यावर रा.स्व.संघाचा ब्राम्हणवाद पेलत राहिली आहे. तो खांदा शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली, उध्दव ठाकरेंनी काढून टाकला आहे. यामुळे मराठा,कुणबी,आगरी,कोळी,माळी यासारख्या शूद्र-ओबीसी,हिंदू दलित यांच्या

ओठा-पोटात भिनलेला रा.स्व.संघ प्रणीत ब्राम्हणवाद या पुरोगामी राज्याच्या मानगुटीवरुन भिरकावल्या गेला आहे. एका अर्थाने महाराष्ट्रात प्रस्थापित झालेल्या नव पेशवाईची कबर पेशवाईचे जन्मस्थान असलेल्या महाराष्ट्रातच खोदली गेली आहे.याचे सर्व श्रेय शरद पवारांचे आहे. शिवसेनेला ब्राह्मणी पाशातून मुक्त करून प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा पुनरुज्जीवित करण्याची आशा शरद पवारांनी जागृत केली आहे. या अर्थाने महाराष्ट्राने केलेली ही नवक्रांती आहे. या नवक्रांतीचे आम्ही अंतःकरण पूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्रातील तमाम परिवर्तनवाद्यांनी या क्रांतीचे स्वागत केले पाहिजे अशी अपेक्षा बाळगतो.

~ सुनील खोबरागडे
संपादक दैनिक जनतेचा महानायक
मुंबई

(अब आप नेशनल इंडिया न्यूज़ के साथ फेसबुकट्विटर और यू-ट्यूब पर जुड़ सकते हैं.)

Did you find apk for android? You can find new Free Android Games and apps.

शयद आपको भी ये अच्छा लगे लेखक की ओर से अधिक